पॉलिपॅथिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण कार्य
हार्दायन, श्रीदत्त देवस्थान मठ, श्रीक्षेत्र आडी मार्फत परमात्मराज अधिष्ठान, वंदूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) या ट्रस्टच्या माध्यमातून वंदूर येथे शंभर बेडचे पॉलिपॅथिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण कार्य हाती घेतले आहे. येथे भाविकांनी आपल्या परीने आर्थिक स्वरूपात, वस्तूरूपात, श्रमरूपात साहाय्य केले, करीत आहेत. अनेक दानशूर अशा व्यक्ती आर्थिक साहाय्य करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे काम झाले आहे. गिलावाही पूर्ण झाला आहे. फरशी, दरवाजे, खिडक्या, कलर व इतरही अनेक आवश्यक कामे होणार आहेत. एकूण तीन एकर क्षेत्र असल्याने पार्किंग व इतरही महत्त्वपूर्ण कामांसाठी एवढी जागा पुरेसी आहे. अनेक भाविकांच्या सहयोगातून सुयोग्य वेगाने हे निर्माण कार्य चालू आहे.
शंभर बेडकरिता दोन मजले बांधणे आवश्यक होते. ते आता पूर्णत्वास आले आहेत. विविध मशिनरी, इतर उपकरणे व अनेक आवश्यक बाबींसाठीचा खर्च वेगळा आहे. त्यासाठी भाविकांची साथ मिळत आहे. या ट्रस्ट ला 80G ही कर सवलतही आहे. याचाही देणगीदार लाभ घेत आहेत. परमात्मराज महाराजांनी धरलेले प्रत्येक कार्य पूर्णत्वास जात असते, असा भाविकांचा विश्वास आहे. कारण, त्यांचे कार्य म्हणजे भगवंताचे कार्य आहे. भगवान् दत्तात्रेयांचा आशीर्वाद त्यांच्या प्रत्येक कार्याला असतो. एखादे कार्य महाराजांनी हाती घेतले की भाविकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण होत असते. हजारो हात त्यांच्या कार्यासाठी राबत असतात. कारण त्यांचे कार्य हे जनतेसाठीच आहे.
इथे ॲलोपॅथीच्या विविध विभागांप्रमाणेच जुनाट आजारांच्या निवारणासाठी होमिओपॅथी व आयुर्वेदिक उपचार विभागही असणार आहेत. त्यामुळे या उपचारांचा लाभ कोल्हापूर, सांगली, बेळगांव, सिंधुदुर्ग आदी अनेक जिल्ह्यांसह इतर भागातील लोकांनाही घेता येऊ शकणार आहे. येथे अगदी योग्य मोबदल्यात सुयोग्य उपचार समाजातील सर्वच गरजवंतांना मिळतील, हा जनतेचा विश्वास आहे. असेच सर्वांचे सहकार्य लाभून आदरणीय गुरुवर्य परमपूज्य परमात्मराज महाराजांचे हे समाजोपयोगी कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावो, हीच भगवान दत्तात्रेयांच्या चरणी विनम्र प्रार्थना.